
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मोकळ्याढाकळ्या वक्तृत्व शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. विशेषत: ग्रामीण भागात गेल्यानंतर ते अस्सल ग्रामीण शैलीत चिमटे काढत असतात. आज बारामती तालुक्यातील निंबूत येथे समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित मंगल कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चांगलेच चिमटे काढले.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, प्रमोद काकडे, पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, नीता फरांदे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बांधकाम विभागाचे राज्यमंत्री हे दत्तात्रय भरणे आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी जिल्ह्याला चांगला निधी दिला आहे. माझ्यासह पुरंदरचे आमदार संजय जगताप भरणेमामांना आमच्याही तालुक्यावर लक्ष ठेवा असे सांगत असतो. तुम्ही राज्यमंत्री एकट्या इंदापूरचे राज्यमंत्री नसून राज्याचे राज्यमंत्री आहात. त्यामुळे आम्हालाही निधी द्या अशी विनवणी त्यांना करावी लागते अशा शब्दांत अजित पवार यांनी भरणे यांना टोले लगावले.
बांधकाम खातं जरी तुमच्या हातात असलं तरी तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. त्यामुळं मी निधीच दिला नाहीतर बांधकाम विभागाला काय मिळणार असाही सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. एकूणच अजितदादांच्या या टोलेबाजीमुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला.