पुणे : प्रतिनिधी
आज पुण्यात विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची थेट नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली. महापुरुषांबद्दल काही महत्वाच्या पदावरील व्यक्ती चुकीची वक्तव्ये करतात, याबद्दल दखल घ्यावी अशी विनंती अजितदादांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उदघाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, माई ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे विविध मागण्या केल्या. त्याचवेळी राज्यात महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या काही व्यक्ती महापुरुषांबद्दल चुकीची व्यक्तव्ये करुन त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचवत आहेत असे सांगत राज्यपालांची तक्रार थेट पंतप्रधानांकडे केली.