पुणे : प्रतिनिधी
मशिदींवरील भोंग्यावरून सुरू झालेलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील राजकारण आज अखेर संपुष्टात आलं आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी आपण पूर्णपणे समाधानी असल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी उद्या ठाण्यात होणाऱ्या सभेत अनेक उत्तरं मिळणार असल्यानं आपणही त्या सभेला जाणार आहोत असेही वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.
मागील आठवड्याभरात राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यातच पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. त्यामुळे वसंत मोरे मनसेशी फारकत घेतील अशीही चर्चा होती. मात्र आज राज ठाकरे यांच्या भेटीनंतर या सर्व चर्चांना विराम मिळाला आहे.
वसंत मोरे यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मी पुर्णपणे समाधानी असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. उद्या ठाण्यात राज ठाकरे यांची सभेत सभा होत आहे. त्या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. त्यामुळे मला साहेबांनी सांगितलं की उद्या तु सभेत ये. त्यामुळे मी देखील त्या सभेला जाणार आहे, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचवेळी आपण राज ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वसंत मोरे यांनी या भेटीनंतर एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये मी माझ्या साहेबांसोबत. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही, जय श्रीराम असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.