मुंबई : प्रतिनिधी
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून धाड टाकण्यात आली. या धाडीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यावर राज्यातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवाब मलिक यांना कुठल्यातरी प्रकरणात अडकवून त्रास दिला जाईल, याची आम्हाला खात्री होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतताना ही प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हटले, धाड पडली यामध्ये काही नवीन नाही. नवाब मलिक यांना कुठल्यातरी प्रकरणात अडकवले जाईल,याची आम्हाला अगोदरच खात्री होती. आज ना उद्या हे घडणार होते. काहीतरी प्रकरण काढून त्यांना त्रास दिला जाईल, याची आम्हाला कल्पना होती. साधा कार्यकर्ता असला तरी दाऊदचे नाव घ्यायचे आणि त्यांना अडकवायचे असा प्रकार चालू असल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणावर निशाणा साधला.
कदाचित तुम्हाला माहिती नसावे. त्यावेळी तुम्ही लहान असाल. मी मुख्यमंत्री असताना माझ्यावर देखील असा आरोप झाला होता. आताही त्याच प्रकारे नावे घेऊन लोकांना बदनाम करणे, त्यांना त्रास देण्याचे काम चालू आहे. केंद्र सरकारच्या विरोधात थेट आणि स्पष्ट भूमिका घेणाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार चालू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.