सभागृहात 215 पेक्षा अधिक डेमोक्रेट आणि 5 रिपब्लिकन खासदारांचं महाभियोगाला समर्थन आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संसदेत (US Capitol) समर्थकांनी घातलेल्या गोंधळाप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार आहे. महाभियोग प्रस्तावावर संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आज मतदान झाले.
सभागृहात 215 पेक्षा अधिक डेमोक्रेट आणि 5 रिपब्लिकन खासदारांनी याला समर्थन दिले आहे. महाभियोग चालवण्यासाठी 218 मतांची गरज होती.हा प्रस्ताव संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे सिनेटमध्ये पाठवला जाईल. पण सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडे बहुमत नाही. 25 व्या घटनादुरुस्तीचा वापर करून ट्रम्प यांना पदावरून हटवण्यास उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी नकार दिलाय. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवून पदावरून हटवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आग्रही आहेत.
आठवडाभरापूर्वी संसदेत हल्ला करण्यासाठी समर्थकांना चिथावणी दिल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या व्हीडिओमुळे हिंसाचार होऊ शकतो यामुळे आता यूट्युबनेही त्यांचं अकाऊंट 20 जानेवारीपर्यंत बंद केलं आहे. या आधी ट्विटरनेही डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकने आणि इन्स्टाग्रामनेही 20 जानेवारी पर्यंत ट्रम्प यांच्या अकाउंटवर बंदी घातली आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे की निर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमापर्यंत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर करु शकणार नाहीत.
महाभियोगाची कारवाई करण्यासाठी जो बायडन यांचा दबाव
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाब वाढवला आहे. त्यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलंय की अमेरिकन कायदा कोणत्याही शक्तिशाली व्यक्तिच्या बचावासाठी नाही. जो बायडेन म्हणाले की, “अमेरिकन राष्ट्रपती कायद्यापेक्षा मोठे नाहीत. न्याय हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आहे, कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीच्या बचावासाठी नाही.”