Site icon Aapli Baramati News

प्रोफाईल फोटोवर तिरंगा ध्वज का नाही? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेटकऱ्यांचा सवाल

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

देशात सध्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत असून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या

पार्श्वभूमीवर आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर भारताच्या राष्ट्रध्वजाचा फोटो लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो बदलण्यात आले नाहीत. त्यामुळे नेटकऱ्यांनी आरएसएसला ट्रोल केलं आहे.  त्यावर आता संघाकडून प्रतिक्रिया आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात आले की,  अशा गोष्टींचे राजकारण केले जाऊ नये. संघाने ‘हर घर तिरंगा’ आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांना आधीच पाठिंबा दिला आहे. संघाने जुलैमध्ये लोकांना आणि स्वयंसेवकांना या कार्यक्रमांना पूर्ण पाठिंबा आणि सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. सरकार, खाजगी संस्था आणि संघाशी संबंधित संघटनांनी अमृतमहोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असं आवाहन केल्याचंही संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतरही  संघाने वेबसाईट आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचे चित्र न टाकल्यामुळे आरएसएसला ट्रोल करण्यात आले होते. यावर आंबेकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच असे मुद्दे आणि कार्यक्रम राजकारणापासून दूर ठेवले पाहिजेत, असंही त्यांनी नमूद केलं.

‘मन की बात’मध्ये, पंतप्रधान मोदींनी लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचे प्रोफाइल चित्र तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रवृत्त करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version