मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात ८ फेब्रुवारीला संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले होते. व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र पाठवत आजिबात घाबरू नकात, काँग्रेस तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. याचा मी निषेध करतो. तुम्ही लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून मोदी सरकार विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा खुलासा झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे. आम्ही भीती आणि अनुकूलता न दर्शवता तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यला पाठिंबा देत असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
संजय राऊत यांनी राहुल गांधी यांनी लिहिलेले पत्र ट्विट केले आहे. त्यांनी राहुल गांधी यांचे आभार मानत स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आमच्या या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागणार असल्याचे म्हटले आहे. तपास यंत्रणा पक्षांच्या गुलामगिरीत वागत आहे. हे केवळ दुर्दैवच नाही तर हे धोकादायक देखील आहे. परंतु मला खात्री आहे ही वेळ सुद्धा निघून जाईल, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.