सुपे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न अनेक दिवसांपासून मार्गी लागलेला नाही. या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या पंधरवड्यात नियोजित विमानतळाबाबत संबंधितांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले आहे.
आज शरद पवार यांनी सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या इमारतीची पाहणी केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवार म्हणाले, या आंतरराष्ट्रीय नियोजित विमानतळाच्या जागा निश्चित झाल्या होत्या. परंतु संरक्षण खात्याने हरकती घेतल्यामुळे हा प्रश्न निलंबित राहिला आहे. त्यासाठी आपण या पंधरवड्यातच खासदार सुप्रिया सुळे, मी स्वतः आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी मिळून संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे.
पुण्यात संरक्षण खात्याचा विभाग आहे. दररोज सकाळी नियमितपणे त्यांची विमाने सरावासाठी या भागातून जात असतात. या अगोदर संरक्षण विभागाची याबाबत काय भूमिका आहे. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच या नियोजित विमानतळ संदर्भात मार्ग काढला जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले.