Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : उद्या पुण्यात शरद पवार-नरेंद्र मोदी येणार एकाच व्यासपीठावर; महाविकास आघाडीतून होतोय विरोध..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

पंतप्रधान नरेंद्र यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. मणिपूर घटनेचे पडसाद देशभर उमटत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधानांच्या सत्कारासाठी शरद पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांकडून दबाव आणला जात आहे. परंतु हा राजकीय कार्यक्रम नसल्यामुळे शरद पवार या कार्यक्रमाला हजर राहतील असेच संकेत मिळत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि. १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाची चर्चा होत आहे.

मणिपूरमध्ये हिंसाचार माजलेला असताना देशाचे पंतप्रधान तिकडे गेले नाहीत. त्याचवेळी त्यांनी याबाबत प्रतिक्रियाही दिली नाही. त्याचवेळी पंतप्रधानांच्या पक्षाने थेट राष्ट्रवादीत फुट पाडत अजित पवार यांना सोबत घेतले. त्यामुळे शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये यासाठी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या कॉँग्रेस आणि शिवसेनेकडून दबाव आणला जात आहे. मणिपूर पेटलेलं असताना पंतप्रधानांचा सत्कार शरद पवार यांनी करू नये असं कॉँग्रेसकडून सांगितलं जात आहे.

दुसरीकडे राज्यात ज्या राजकीय घडामोडीनंतर अजित पवार आणि अन्य नेत्यांनी सरकारला पाठिंबा दिला. हे सर्व भाजपने घडवलेलं असताना त्यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र जाणं योग्य नसल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या सत्काराला उपस्थित राहणं म्हणजे अजित पवार यांच्या कृतीला पाठिंबा असल्याचं दर्शवणं ठरेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याबाबत संभ्रम आहे. परंतु हा राजकीय कार्यक्रम नाही, त्यामुळे शरद पवार हे या कार्यक्रमात सहभागी होतील असे संकेत त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळत आहेत. एकूणच राज्यातील राजकीय उलथापालथ आणि मणिपूरमधील हिंसाचार या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच महाराष्ट्रात तेही पुण्यात येत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या उद्याच्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version