Site icon Aapli Baramati News

BIG BREKING : मोदी सरकारविरोधात विरोधकांकडून अविश्वास ठराव; लोकसभा अध्यक्षांनी दिली प्रस्तावाला मंजूरी, लवकरच प्रस्तावावर होणार चर्चा

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूर केला आहे. या अविश्वास ठरावावर चर्चेची वेळ आणि तारीख लवकरच निश्चित केली जाणार असल्याचं लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, २०१७ नंतर आता दुसऱ्यांदा अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मणीपुरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. अशातच आज पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या निवेदनावरून संसदेत गदारोळ झाला. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत मणीपुर घटनेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी आज सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला. या ठरावाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरी दिली आहे. याबाबत चर्चा कधी होणार याबाबत मात्र अध्यक्षांनी वेळ स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली.

मोदी सरकारविरोधात यापूर्वी २०१७ मध्ये अविश्वास ठराव आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्ष या ठरावासाठी वेळ आणि तारीख ठरवणार आहेत. त्यानुसार अविश्वास ठरावावर चर्चा होईल. या प्रक्रियेनुसार ठराव मंजूर झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो.  विरोधकांनी प्रतीकात्मकदृष्ट्या हा ठराव मांडला असून ठरावावरील चर्चेत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version