Site icon Aapli Baramati News

Viral Video : ‘तो’ व्हिडीओ हैदराबादचा; मुलाला बेदम मारहाण करणारा नराधम गजाआड

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

एक बाप आपल्या मुलाला काठीने बेदम मारहाण करत असलेला एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाला होता. या कृत्याबद्दल सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत होता. ‘आपली बारामती न्यूज’ च्या माध्यमातूनही या प्रकरणाला वाचा फोडण्यात आली होती. अखेर या नराधमाला अटक करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार हैदराबाद येथील असून स्थानिक पोलिसांनी संबंधित पित्यावर कारवाई केली असल्याचे आता समोर आले आहे.

मागील काही दिवसांत एक व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक नराधम बाप आपल्या ५-७ वर्षांच्या आतील मुलाला काठीने मारत आहे. तो मुलगा अंगावर काठीचे घाव सोसत विनवण्या करताना दिसत आहे. मात्र तरीही त्या नराधम बापाला पाझर फुटत नसल्याचे या व्हिडीओत पहायला मिळत आहे. काठीचे तुकडे होवूनही आणि पोटच्या मुलांच्या विनवण्यानंतरही हा नराधम भानावर येत नसल्याचेही या अडीच मिनिटांच्या व्हिडीओत दिसून आले होते.

त्यामुळे या संपूर्ण प्रकाराबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाईची मागणी होत होती. या व्हिडीओच्या संदर्भाने काही गोष्टी समोर आल्या आहेत. हा व्हिडिओ हैदराबादमधील असून संबंधित नराधम पित्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचवेळी संबंधित मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा चिमुकला मावशीकडे गेलेले असताना तिथे मस्ती करत होता. ही बाब समजल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील अशोकने मुलाला काठीने प्रचंड मारहाण केली. विशेष म्हणजे अशोकनेच आपल्या मुलीला हा व्हिडीओ शूट करण्यासाठी सांगितला. पुढे शेजाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानुसार अशोकला अटक करण्यात आली आहे.   


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version