पुणे : प्रतिनिधी
जिल्हा परिषद पुणे व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट ३ व परिशिष्ट ३(अ) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा परिषद पुणे, सर्व तहसिल कार्यालये, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व जिल्हा परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर २ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२ साठी निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्याअनुषंगाने पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभागरचनेस विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार ही प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडील सूचनांनुसार प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे कक्ष तयार करण्यात आला आहे. प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या १३ पंचायत समित्यांचा निवडणूक विभाग व निर्वाचक गण यांच्या हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, बी विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे कार्यालयीन वेळेत २ ते ८ जून २०२२ या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी पुणे यांनी कळविले आहे.