Site icon Aapli Baramati News

ऐश्वर्य कट्ट्याच्या मुलाखतीत उलगडले सुनेत्रा पवार यांच्या कार्याचे विविध पैलू..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील धनकवडी परिसरात माजी नगरसेवक आप्पा रेणुसे व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित ऐश्वर्य कट्टा या उपक्रमांतर्गत बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत सुनेत्रा पवार यांच्या कार्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडले. 

या मुलाखतीत सुनेत्रा पवार यांनी माहेर आणि सासरच्या राजकीय व सामाजिक कार्याची माहिती दिली. त्याचवेळी अजितदादांच्या स्वभावगुणांबद्दलही त्यांनी मनमोकळेपणानं मतं व्यक्त केली. अजितदादा हे स्वभावाने कडक वाटत असले तरी ते शेतकरी कुटुंबातील असल्यानं रांगड्या पद्धतीने बोलतात. प्रत्यक्षात अजितदादांसारखा भावनिक माणूस मी पाहिलेला नसल्याचं सुनेत्रा पवार यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं.

‘माझ्या सासरी आणि माहेरी राजकीय वारसा लाभला. मात्र आजवर मी सामाजिक कार्यात रमले. आजवर कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करुनच इतर कामांवर लक्ष केंद्रीत केलं आणि त्यात यशही मिळवलं”, ही बाब समाधान देणारी असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं.. 

येणाऱ्या काळात जनतेनं साथ दिली आणि संधी दिली तर मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याबरोबरच महिलांचं संरक्षण होण्यासह त्यांचे अधिकार मिळवून देण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचं त्या म्हणाल्या. संधी मिळाल्यानंतरच कोणत्याही व्यक्तीचं काम दिसतं असंही सांगायला त्या विसरल्या नाहीत..

या कार्यक्रमाला आमदार भिमराव तापकीर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर, माजी नगरसेवक आप्पा रेणुसे,माजी महापौर दत्ता धनकवडे, वर्षा तापकीर, यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version