जुन्नर : प्रतिनिधी
मागील काही दिवसात बिबट्याचा नागरी वस्त्यांमधील तसेच शेतांमध्ये वावर वाढला आहे. अशातच जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील आळे गावात बिबट्याने एका चार वर्षांच्या चिमूरड्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या या चिमूरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शिवांश अमोल भुजबळ (वय : ४ वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, भुजबळ कुटुंबीय आळे गावातील तितरमळा येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोरच उसाची शेतीही आहे. अमोल भुजबळ यांचा मुलगा शिवांश हा अंगणात आपल्या आजोबांसोबत खेळत होता. त्यावेळी अचानकपणे उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने शिवांशवर हल्ला केला.
या बिबट्याने अक्षरश: चिमूरड्याला उसाच्या शेतात फरफटून नेलं. त्याचवेळी ही घटना पाहणाऱ्या अविनाश गडगे या तरुणाने मोठ्या धाडसाने पुढे येत बिबट्याचा पाठलाग करत या चिमूरड्याची सुटका केली. परंतु या हल्ल्यात हा चिमुरडा गंभीर जखमी झाला होता. त्याला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान या चिमूरड्याचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर, आळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसात या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मात्र वन विभागाकडून कोणतीही उपाययोजना होत नाही. त्यामुळे आता नागरीकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.