Site icon Aapli Baramati News

कासारसाई धरणात बुडून दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी 

मुळशी तालुक्यातील कासारसाई धरणात बुडून दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. शशांक सिन्हा (वय १९) आणि रवीकुमार विनोद कुमार (वय १९) असे धरणात बुडून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत. दोघेही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते. ते दोघे गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या इतर चार मित्रांसोबत फिरण्यासाठी कासारसाई धरण परिसरात गेले होते.

सगळे मित्र धरणाच्या पाण्याशेजारी उभा होते. यादरम्यान शशांक, रवी कुमार आणि  त्यांच्या एक मित्र पाय घसरून पाण्यात पडले. तिघांपैकी शशांक आणि रवी कुमार खोल पाण्यात बुडले. उर्वरित पाण्यात बुडलेल्या एकाला इतर मित्रांना वाचवण्यात यश आले. मित्रांनी शशांक आणि रवीकुमार या दोघांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला होता.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version