पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील गुगलचं ऑफिस उडवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी कोरेगाव पार्क येथील गुगल ऑफिसची तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, गुगलच्या मुंबईतील ऑफिसमध्ये फोन करून धमकी देणाऱ्याला हैद्राबादमधून अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, काल मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये एकाने निनावी फोन करत पुण्यात असलेल्या गुगल ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचे आणि हे ऑफिस उडवून देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने या इमारतीची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बॉम्ब शोधक पथकाने या संपूर्ण इमारतीची पाहणी केली.
दरम्यान, हा फेक कॉल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हैद्राबाद येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीने हा फोन केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संबंधित धमकी देणाऱ्या व्यक्तीचा भाऊ पुण्यात वास्तव्य करतो. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. त्यातूनच त्याने दारूच्या नशेत असताना गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.