Site icon Aapli Baramati News

PUNE : चहाची तलफ बेतली जीवावर; पुण्यात डोक्यात झाडाची फांदी डोक्यावर पडून युवकाचा मृत्यू

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

चहाची तलफ एका युवकाच्या जीवावर बेतली आहे. पुणे शहरातील शनिवार पेठेत ओंकारेश्वर मंदिराजवळ एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेल्या युवकाच्या डोक्यावर झाडाची फांदी कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची घटना त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी घडली आहे.

अभिजीत गुंड (वय ३२, रा. कसबा पेठ) असे या घटनेत मृत पावलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रविवारी संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. अभिजीत हाही त्या ठिकाणी आला होता.

दरम्यानच्या काळात तो आपल्या मित्रांसमवेत चहा पिण्यासाठी मंदिराजवळ असलेल्या एका टपरीवर गेला. त्या ठिकाणी चहा पित असताना अचानक झाडाची फांदी अभिजीतच्या डोक्यावर पडली. त्यामध्ये अभिजीत हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला नागरिकांनी  रिक्षातून रुग्णालयात नेले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेनंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यादरम्यान अशा झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. मात्र यावर्षी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा धोकादायक फांद्या झाडांनाच लटकून आहेत. त्यातूनच अभिजीतसारख्या निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version