
इंदापूर : प्रतिनिधी
स्वत:च्या बापाचा डोक्यात दगड घालून मुलानेच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण नजीकच्या मदनवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात हत्या करणाऱ्या मुलावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राजेंद्र छगन कुंभार असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून छगन गजानन कुंभार असे हत्या झालेल्या बापाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र कुंभार हा बुधवारी ( दि.२३) सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास भिगवण पोलिस ठाण्यात आला. माझ्या वडिलांची कोणीतरी डोक्यात दगड घालून हत्या केली असल्याची माहिती त्याने पोलिसाला दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी बारकाईने पाहणी केली चौकशी केली.
पोलिसांनी राजेंद्र कुंभारची चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली.परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. वडील छगन कुंभार नियमितपणे दारू पिऊन शिवीगाळ करत असत. दारू पिल्यानंतर रात्र-रात्र घराच्या बाहेर राहत. त्यामुळे वडील झोपेत असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली असल्याची कबुली राजेंद्र कुंभारने पोलिसांना दिली.