पुणे : प्रतिनिधी
टीईटी परीक्षेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या परीक्षेत तब्बल २४० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. २०१९ च्या ७ हजार ८०० अपात्र विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी तीन ते चार लाख रुपये घेतले असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, या प्रकरणात अटकेत असलेल्या सुशिल खोडवेकर याचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
टीईतीन घोटाळा प्रकरणात आतापर्यंत परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे.अधिकार्यांपासून राज्य परीक्षा परिषदेचे संचालक या प्रकरणात सहभागी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. या यादीतील निम्म्या ७ हजार ८०० अपात्र विद्यार्थ्यांना पात्र केले होते. या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी तीन ते चार लाख रुपये घेतले आहे असे पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
या घोटाळ्यातील सगळ्यात मोठा अधिकारी असलेला सुशील खोडवेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खोडवेकर हे परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव या गावातील रहिवासी आहेत. या परीक्षेत जेव्हा घोटाळा झाला तेव्हा तो शालेय शिक्षण विभागामध्ये उपसचिव या पदावर कार्यरत होता.