पुणे : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून जिल्हा परिषदांचे गट आणि पंचायत समिती यांचे गण यांची जिल्हा प्रशासनाने केलेली प्रारूप रचना रद्द करण्यात आली आहे. तर २० मार्च रोजी जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपल्याने आजपासून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.
निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणरचनांचे सादर केलेली प्रारूप रचना रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारच्या आदेशानुसार नव्याने गट आणि गण यांची रचना आणि आराखडे तयार केले जाणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे आराखडे तयार करून ते मंजूर करण्याचे अधिकार संपुष्टात आल्याने आता संपूर्ण गट आणि गण रचना ही नव्याने केली जाणार आहे. यासंदर्भातील सूचना राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून दिल्या जातील.
दरम्यान, १४ मार्चपासून पुणे जिल्ह्यातील पंचायत समितींची गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रशासकाची सूत्र देण्यात आली असून जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपल्यामुळे आजपासून जिल्हा परिषदेचा कारभारही प्रशासक पाहणार आहेत.