पुणे : प्रतिनिधी
एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने एसबीआय बँकेतील कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्यांना लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गणेश निवृत्ती दराडे (वय २४, मूळ रा. बीड, सध्या रा. कर्वेनगर) याला अटक केली आहे.
याबाबत रोहीत पवार यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मूळचा बीड येथील रहिवासी असणारा गणेश पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी राहतो. तर एसबीआय बँकेत कनिष्ठ सहयोगी पदावर रोहित पवार काम करत आहेत. १८ फेब्रुवारी रोजी ते साप्ताहिक सुट्टीसाठी दुचाकीवर चालले होते.
दरम्यान साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँडजवळ थांबले असताना दराडे आणि त्याच्या साथीदाराने तेथे येऊन त्यांना मारहाण करून करत जबरदस्तीने त्यांच्याच दुचाकीवर बसवून मुकुंदनगर येथील सत्यम शिवम बंगल्यासमोर घेऊन गेले. तेथे मारहाण करत त्या दोघांनी फोन पेचा पासवर्ड घेऊन ६७ हजार रुपये स्वतःच्या खात्यात जमा करुन घेतले.
त्यानंतर रोहित पवार यांनी स्वारगेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. पोलीस सध्या त्याच्या साथीदाराचा घेत आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.