पुणे : प्रतिनिधी
सध्या समाजात दरी निर्माण करणाऱ्या अनेक घटना आपण पाहतो.. यात अनेक कुटुंबांची वाताहतही आपण अनुभवली आहे.. मात्र आजही जात-धर्माच्या पलीकडे माणुसकी जीवंत असल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर येतात.. पुण्यातील तळेगाव रेल्वे स्टेशनवरही एक असाच हृदय हेलावून टाकणारा आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा प्रसंग घडला.. भाषणकला प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी अनुभवलेला हा थरारक प्रसंग शब्दबद्ध केलाय..
धावती रेल्वे,एका गर्भवती महिलेला बाळंतपणाच्या कळा आणि डॉक्टरची शोधाशोध…थरारक प्रसंग आणि कृतार्थ अनुभव…
आज दुपारनंतर थोडा निवांत वेळ होता. तळेगांव रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट काढून एका बाकड्यावर बैठक मारली होती.सोबत एक पुस्तक घेतले होते. इकडे एक्सप्रेस,पॅसेंजर,मालगाडी,लोकल यांची रेल्वे ट्रॅकवरची धडधड धडधड अव्याहतपणे सुरु होती. आता हळूहळू पुणे लोकलची वाट पाहणार्या प्रवशांची गर्दी वाढू लागली होती. पण तितक्यात मुंबई – हैद्राबाद एक्सप्रेस तळेगांव रेल्वे स्टेशनच्या आवारात शिरु लागली. एक्सप्रेस स्टेशनजवळ येताना प्लॅटफॉर्मच्या बाजूचा ट्रॅक मिळाल्याने थोडी स्लो झाली होती.
अचानक एका डब्यातून गाडी रोको- गाडी रोको असा मोठ्या आवाजातील गलका सुरु झाला.काही प्रवासी खिडकीतून मोठ्याने ओरडत please stop असे ओरडत होते. प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी त्याच गडबड गोंधळात रेल्वे गार्डला थांबण्याचा इशारा केला. वॉकीटॉकीवर निरोप देत गाडी तळेगांव स्टेशनला थांबा नसतानाही थांबल्याने सगळेच गोंधळात होते.त्यात ही एका डब्यातील गडबड ऐकून नेमके काय झाले आहे ? काय चालले आहे ?तेच कळेना…
जनरल डब्यातून एका मुस्लिम कुटूंबाला डब्यातील तरुणांनी घाईघाईत डब्यातून उतरवले. या कुटूंबात महिला आणि वयस्कर मंडळींचे प्रमाण जास्त होते. त्यांच्या चेहर्यावर भितीचे सावट जाणवत होते. मीही त्या गर्दीत नेमके काय घडलेय हे जाणून घेण्याची इतरांप्रमाणे धडपड केली.त्या मुस्लिम कुटूंबातील (आठवा महिना लागलेली एक गर्भवती ) महिला भगिनीला अचानक प्रसुतीवेदना सुरु झाल्या होत्या.बाळाचे डोके बाहेर यायला लागले होते.
इकडे प्लॅटफॉर्मवर गोंधळ वाढतच होता. रेल्वे गार्ड डॉक्टरला फोन करत होता. त्याचवेळेला सर्वात पाठीमागच्या डब्यातील महिला नेमके काय चाललेय हे न समजल्याने घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत रडू लागल्या होत्या. मी तिथे जाऊन त्यांना नेमके काय झालेले आहे याची कल्पना देऊन काळजी न करण्याची विनंती केली.काहींना हा माझा आगाऊपणा वाटेल,काहींना पांचटपणा वाटेल पण मला त्यावेळी ते योग्य वाटले.
पण अनपेक्षित फायदा असा झाला…त्या महिलांच्या डब्यामधील एक महिला डॉक्टर होत्या. त्यांनी ‘मी तुमच्यासोबत येते’ असे म्हणत आपल्या जवळील सामानाची काळजी न करता डब्यातून प्लॅटफॉर्मवर जवळजवळ उडीच मारली. इकडे त्या गर्भवती महिलेची त्या वेदनेतून सुटका होण्यासाठी सगळेच डॉक्टरशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. या महिला डॉक्टरने त्या घोळक्यात जाताक्षणी सुत्रे हातात घेऊन तातडीने आवश्यक उपचार सुरु केले.काही मिनिटांत एका बाळाचा जन्म झाला खरा.पण त्याचीही प्रकृती थोडी गंभीरच होती. हे सगळे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर घडत होते.
तोपर्यंत स्टेशन मास्तरांच्या सौभाग्यवती तसेच काही महिला पोलिस तिथे पोहोचल्या होत्या.पाच ते दहा मिनिटांत डॉक्टरांनी त्या आईला व बाळाला रुग्णालयात नेणे गरजेचे आहे असे सांगितल्यानंतर त्याप्रमाणे कार्यवाही सुरु झाली.रेल्वे स्टेशनवर स्ट्रेचर नव्हते तर एकाने आपल्याकडची मजबूत चादर तिथे उपलब्ध केली. ते कुटूंब स्टेशनबाहेर हॉस्पिटलच्या दिशेने लगबगीने बाहेर पडले. प्लॅटफॉर्मवरील लोकांनी आताशा टाळ्या वाजवून हा प्रसंग सेलिब्रेट केला.अर्थात त्या बाळाची प्रकृती लवकर सुधारावी हा विचार सर्वांच्या बोलण्यात जाणवत होता.
त्या महिला डॉक्टरला त्यांच्या डब्याजवळ पोहोचवताना मी त्यांना हात जोडून धन्यवाद म्हणालो खरे…पण त्या म्हणाल्या, ‘अहो दादा,तुमचेही आभार. कारण नेमके काय झाल्याने गोंधळ सुरु आहे हे माहीत नसल्याने आम्हीही सगळ्याजणी थोड्या घाबरलो होतो.पण तुम्ही नेमका प्रकार सांगितल्याने मला मदतीला येता आले.अर्थातच मी माझे कर्तव्य केले.’ त्यांना एका सेल्फीसाठी विनंती केली असता त्याही आनंदाने ” हो” म्हणाल्या.
सेल्फी झाल्यावर त्यांना विचारले, ‘या देव माणसाचे नाव कळेल का ? अर्थात आपली इच्छा असेल तरच सांगा.’ त्या म्हणाल्या, ‘मी डॉक्टर सुवर्णा तुंगे.. मी पुण्यात प्रॅक्टीस करते.’ तोपर्यंत रेल्वे सुरु झाली होती. डॉक्टर सुवर्णा तुंगे बायबाय करत होत्या.डब्यातील सगळ्या महिला त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करत होत्या.
डब्यातल्या त्या प्रवाशांमधील अनेक तरुण मुलेही त्या मुस्लिम कुटूंबाच्या मदतीसाठी धडपडत होते.त्यांनीच तर रेल्वे थांबविण्यासाठी प्रयत्न केले. त्यातील कोणाची जात कोणती, धर्म कोणता हे जाणून घ्यायची गरजही नाही. आता तुम्ही म्हणाल, ‘मग त्या कुटूंबाचा मुस्लिम कुटूंब असा सारखा उल्लेख करण्याची काहीच गरज नव्हती. मलाही माहितीए, अशा वेळेला सगळेच एकाच धर्माचे असतात.. तो म्हणजे ‘माणुसकी’..!
मला एवढेच सांगायचे आहे मित्रांनो….हाच खरा भारत आहे.हाच खरा हिंदुस्तान आहे. जपुया…. त्याला सांभाळूया.. जय हिंद..
माझे आजचे प्लॅटफॉर्म तिकीट सार्थकी लागले.
- शशांक मोहिते, भाषणकला प्रशिक्षक, मो. ९९६००६६९६६