पुणे : प्रतिनिधी
लोन ॲपवर होणाऱ्या सततच्या धमकी आणि बदनामीमुळे पुण्यातील २५ वर्षीय तरुणानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोहेल जावेद शेख (वय 25, विमाननगर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे आहे. त्याने वेगवेगळ्या लोन ॲपवरुन कर्जाची परतफेड करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या धमकी व बदनामीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल याने काही महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या लोन ॲपद्वारे कर्ज घेतले होते.
एक कर्ज फेडण्यासाठी तो दुसरे लोन घ्यायचा. कर्जाची परतफेड करण्यासाठी वारंवार त्याला धमक्यांचे आणि शिवीगाळ करणारे फोन येत होते. इतकेच नाही तर, तुझी बदनामी केली जाईल असेदेखील सांगण्यात येत होते. या त्रासाला कंटाळून सोहेलने राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी सोहेलचे वडील जावेद अब्दुल शेख यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.