पुणे : प्रतिनिधी
शरद पवार पुण्याचा विकास करू शकतात असा भ्रम त्यांनी पुणेकरांच्या मनात पन्नास वर्षे जोपासला असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुळा आणि मुठा नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला स्थगिती देऊन पुन्हा एकदा पुण्याच्या विकासात आडवा पाय घालण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादीने २०१२ सालच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नदीसुधार योजना राबवल्या जाणार असल्याचं जाहीरनाम्यात प्रसिद्ध केले होते. त्यावेळी राष्ट्रवादीची सत्ता असूनही त्यांनी याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. २०१७ च्या निवडणूकीत त्यांनी पुन्हा याच योजनेचा उल्लेख केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी मुळा आणि मुठा नदीच्या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या या कृतीतून त्यांनी पुण्याच्या विकासाबाबत उदासीनता दाखवून दिली आहे. शरद पवार पुण्याचा विकास करू शकतात असा भ्रम त्यांनी पुणेकरांच्या मनात पन्नास वर्षे जोपासला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.