शिरूर : प्रतिनिधी
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी ४ वाजता त्यांचे मूळ गाव असलेल्या तर्डोबाचीवाडी येथील शिवतारा कृषि पर्यटन केंद्रात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शिरूर तालुक्यातील तर्डोबाचीवाडी या छोट्याशा गावातून राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या बाबुराव पाचर्णे यांनी विविध पदांवर काम केले. १९९५ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. कॉँग्रेसकडून उमेदवारी कापली गेल्याने त्यांना ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी लागली. १९९९ साली कॉँग्रेसने त्यांना संधी दिली, मात्र त्यातही त्यांना यश मिळाले नाही.
२००४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत विधानसभेत यश मिळवले. त्यानंतर २००९ साली त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यात त्यांना यश आले नाही. २०१४ साली त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत विधानसभा निवडणूक जिंकली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
या निवडणुकीनंतर पाचर्णे यांच्या प्रकृतीबद्दल तक्रारी जाणवू लागल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.