पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे वयाच्या ६० व्या वर्षी आज (बुधवारी) दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पुण्यातील राजकारणात प्रदिर्घ काळ दबदबा असलेल्या विनायक निम्हण यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
विनायक निम्हण यांना आज दुपारी हृदयाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातच ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. ऐन दिवाळीत विनायक निम्हण यांचं हृदयविकाराने निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
निम्हण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे.
राजकारण, समाजकारणातला चांगला सहकारी गमावला : अजित पवार यांची श्रद्धांजली
“पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी आमदार, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील सहकारी श्री. विनायकराव निम्हण यांचे निधन हा सर्वांसाठी मोठा धक्का आहे. पुण्याच्या विकासात प्रदीर्घकाळ सोबत काम करणारा चांगला सहकारी आज गमावला आहे.
त्यांच्या आकस्मिक जाण्याचं दुःख मोठं आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती निम्हण कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना मिळो. श्री विनायकराव निम्हण यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायकराव निम्हण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.