आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात : अजितदादांनी घेतला समाचार

पुणे
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केल्यापासून त्यांना महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील त्यांच्यावर आपल्या खास शैलीत प्रत्यूत्तर दिले आहे. राज ठाकरे यांना नकलेशिवाय आणि टीकेशिवाय काही जमत नाही. ते सरड्यासारखे रंग बदलत असून त्यांना आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

मनसेचे एकेकाळी निवडून आलेले १४ आमदार सोडून का गेले ? याचे आत्मपरीक्षण राज ठाकरे यांनी करावे. केवळ भाषणे करून जनतेचे प्रश्न सुटत नसून राज ठाकरे सतत पलटी मारतात. त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत भूमिका घेतली होती. विधानसभेच्या काळात सुद्धा त्यांनी काय केले आहे हे आपण पाहिलेच आहे. त्यानंतर आता त्यांनी कालच्या सभेतही काय केले हे सगळ्यांनीच पाहिले असून ते सतत सरड्यासारखे रंग बदलत असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

राज ठाकरे यांनी पवार साहेबांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचे कौतुक केले, परंतू आता ते टीका करत आहेत. मुलाखतीवेळी त्यांना पवार साहेब जातीवादी वाटले नाहीत, परंतु आता त्यांना पवारसाहेब जातीवादी वाटायला लागले आहेत. राज ठाकरे यांचा जन्म नव्हता तेव्हा पवारसाहेब राजकारण करत होते. त्यामुळे अशा लोकांनी शरद पवार साहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्याकडे बघून थुंकल्यासारखे असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us