पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. मागील वर्षी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणेवर एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली होती. गजा मारणेला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. गजा मारणेने काढलेल्या रॅलीमधील बहुतांश गुंडांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
गजा उर्फ गजानन मारणे हा कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या आहे. कोथरूडसह पुणे परिसरात गजा मारणेची दहशत आहे. खंडणी मागणे, हत्येचा प्रयत्न करणे, हत्या, अपहरण अशा विविध गुन्ह्यांमध्ये पुण्यासह जिल्हाभरात त्याच्यावर २४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये झालेल्या एका हत्या प्रकरणात गजा मारणे तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता.
गेल्या वर्षी गजा मारणेची हत्येच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याने साथीदारांसोबत ३०० गाड्यांसह मिरवणूक काढली होती. मिरवणूक काढणे, उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलमधील वस्तू जबरदस्तीने उचलणे या प्रकरणी गजासह त्याच्या १५० साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गजा मारणे फरार झाला होता. पोलिसांनी त्याला साताऱ्यातील जावळी येथून अटक करून एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्द केले होते.