पुणे : प्रतिनिधी
शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या हवा प्रदूषणाला आळा बसावा या उद्देशाने पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर टाळला जात आहे. इंधनावर चालणाऱ्या वाहनांऐवजी सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रयत्न शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाने पुणे महानगरपालिकेला ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्या माध्यमातून २०० इलेक्ट्रिक बस भाड्याने घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
सध्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात २७५ इलेक्ट्रिक आणि ३५० डिझेल बसचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने इंधनावर चालणाऱ्या बसचे प्रमाण कमी केले जाणार असून इलेक्ट्रिक बस खरेदी आणि भाड्याने घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
केंद्र शासनाने वायु गुणवत्ता सुधार हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत ३०० बस या भाड्याने घेतल्या जाणार असून त्यापैकी २०० बस या पुणे महानगरपालिका घेणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून पुढील दोन ते तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले.