
पुणे : प्रतिनिधी
एरवी अनेक पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वाद होत असतात. मात्र पुण्यातील देहूरोड परिसरात पत्नी आणि मेहुणीच्या दारूच्या व्यसनापायी पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित विवाहितेसह तिच्या बहिणीला अटक करण्यात आली आहे.
नारायण मधुकर निर्वळ (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या तरुणाची पत्नी व मेहुणीवर गुन्हा दाखल करत दोघींना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, नारायण निर्वळ हे अॅनिमेशन क्षेत्रात काम करत होते. त्यांनी आपल्या मित्रांसह एकत्रितपणे एका कार्यालयातून आपला व्यवसाय सुरू केला होता.
दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नीलाही वर्क फ्रॉम होम पद्धतीनुसार काम मिळाले होते. दरम्यानच्या काळात नारायण यांची पत्नी आणि मेहुणी ही सातत्याने दारुसाठी नारायण यांच्याकडे पैशाचा तगादा लावत होत्या. संबंधित विवाहितेची बहीणही दारूच्या व्यसनासाठी प्रोत्साहन देत होती. यातूनच नारायण आणि त्यांच्या पत्नीमध्ये सातत्याने वाद होऊ लागले. सातत्याने होणारे वाद आणि शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून नारायण यांनी दि. १७ जानेवारी रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या दरम्यान, नारायण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, दि. २० जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या पत्नी आणि मेहुणीकडून होत असलेल्या त्रासबाबत नारायण यांनी मेसेजद्वारे आपले भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना माहिती दिली होती. त्यानुसार त्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या दोघींना अटक करून न्यायालयात हजर केले. या प्रकरणी अधिक तपास सोहन धोत्रे हे करीत आहेत.