पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपटगृहाबाहेर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून दहा ते बारा जणांनी तलवार आणि कोयत्याने वार करत एका तरुणाची हत्या केली आहे. बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन म्हस्के असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सतीश आनंदा वानखेडे ( रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड (सर्वजण रा. ताडीवाला रोड, पुणे) या नऊजणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नितीन म्हस्के याचा कोरेगाव पार्क परिसरातील एका तरुणासोबत वाद झालेला होता. त्यातून म्हस्के याने आरोपींपैकी एकावर हल्लाही केला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी नितीन म्हस्के याला संपवण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार त्याच्यावर वॉचही ठेवला जात होता.
नितीन म्हस्के हा मंगला चित्रपटगृहात गदर हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांनी त्याच्यावर तलवार, काठ्या, लोखंडी गज आणि कोयत्याने वार करत त्याचा निर्घृण पद्धतीने खून केला. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. शिवाजीनगर पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.