Site icon Aapli Baramati News

PUNE CRIME : पैसे चोरल्याचा संशय; गुप्तांगावार लाथ मारल्यानं कामगाराचा मृत्यू, पुणे शहरातील धक्कादायक घटना

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी   

पैसे चोरल्याच्या आरोपातून गुप्तांगावर लाथ मारल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे शहरातील वडगाव येथील जाधवनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.

संदीप राजाराम पाटील (वय ५६, रा. महादेवनगर, वडगाव) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी प्रसाद गोपाळ कारेकर (वय ३७, रा. जाधवनगर, वडगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, प्रसाद कारेकर याची पानाची टपरी आहे. त्याच ठिकाणी तो चोरट्या पद्धतीने दारूची विक्री करत होता. मयत संदीप हा या ठिकाणी कचरावेचक म्हणून काम करत होता.

संदिपने पैसे चोरल्याच्या संशयातून प्रसाद कारेकर याने बुधवारी दुपारी त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये संदीपच्या गुप्तांगावर लाथ लागल्यामुळे तो बेशुद्ध पडला. रात्री उशीरापर्यंत तो टपरीजवळच पडून होता. दारू पिऊन पडला असावा अशा समजातून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना केल्या. अधिक तपास पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर हे करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version