पुणे : प्रतिनिधी
सांस्कृतिक पुणे अशी ओळख असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यावर अंडी चोरल्याचा संशय घेऊन तिला अंगावरील कपडे उतरवण्यास भाग पाडल्याचा प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात घडला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील येरवडा परिसरातील हॉटेल पार्क ऑर्नेटमध्ये काम करणाऱ्या मुकेश सिंह पुंडील या शेफवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, हॉटेल पार्क ऑर्नेटमध्ये आरोपी मुकेश सिंह पुंडील हा शेफ म्हणून काम करतो. पिडीत ५० वर्षीय महिलाही याच हॉटेलमध्ये काम करत आहे.
मुकेश सिंह याने संबंधित महिलेवर अंडी चोरल्याचा आरोप करत आता तुझी झडती घ्यावी लागेल असं म्हणत तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले. एवढ्यावरच न थांबता त्याने या महिलेला रस्त्यात अडवून तिच्यावर अश्लील भाषेत शेरेबाजी केली. या सर्व प्रकारानंतर संबंधित महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मुकेश सिंह याच्यावर विनयभंग व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडलेल्या या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये घडलेला हा प्रकार चीड आणणारा असून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.