Site icon Aapli Baramati News

PUNE CRIME : पती-पत्नीचा वाद विकोपाला गेला अन् त्यानं थेट पत्नीच्या अंगावर डिझेल टाकत पेटवून दिलं; पुण्यातील धक्कादायक घटना

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पती-पत्नीत सातत्यानं होणारा वाद विकोपाला गेला आणि पतीने थेट पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. गंभीररित्या भाजलेल्या या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे.

पूजा प्रवीण चव्हाण (वय २६) असे या घटनेत मृत पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी प्रवीण भाऊसाहेब चव्हाण (रा. गणपती माथा, अहिरे गाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर संबंधित विवाहितेचा भाऊ अमोल भाऊराव पवार यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, पूजा आणि तिचा पती प्रवीण यांच्यात सातत्याने वाद होत होते. त्यातूनच त्यांच्यात मागील दोन दिवसांपूर्वी जोरदार भांडण झालं. हे भांडण इतके विकोपाला गेले की रागावलेल्या प्रविणने पत्नी पूजाच्या अंगावर थेट डिझेल ओतून दिला पेटवून दिले. त्यामध्ये पूजा ही गंभीररित्या भाजली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, पत्नीला पेटवून दिल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करताच प्रवीण चव्हाण हा फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण चव्हाण याच्यावर भादंवि कलम ३०२ आणि कौटुंबिक हिंसाचार कायदा कलम ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे हे करीत आहेत.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version