Site icon Aapli Baramati News

PUNE CRIME : जन्मदात्या बापाने १५ वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीने वार करत घेतला जीव; धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरलं..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

जन्मदात्या बापाने स्वत:च्या १५ वर्षाच्या मुलीवर कुऱ्हाडीने वार करत तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना पुणे शहरानजीक वाघोली येथे घडली आहे. या घटनेनंतर पुणे शहर हादरलं असून या हत्येमागे नेमकं कारण काय याचा शोध पोलिस घेत आहेत.

अक्षदा फकिरा दुपारगुडे असं या घटनेत मृत पावलेल्या दुर्दैवी मुलीचं नाव आहे. याबाबत लोणीकंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी वाघोली येथील ही घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापाने कुऱ्हाडीने अक्षदा हिच्या डोक्यासह हात आणि पायावर वार केले. त्यामध्ये ही मुलगी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी ससुन रुग्णालयात नेले जात होते. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला. वडिलांनीच मुलीचा जीव का घेतला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे या घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

याबाबत मृत मुलीच्या काकांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पुणे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दुपारगुडे कुटुंबीय हे मूळचे सोलापूरचे असून कामानिमित्त वाघोली येथे वास्तव्यास आहेत. लोणीकंद पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. या खूनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version