
पुणे : प्रतिनिधी
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय समोर आणल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यातच पुणे मनसेत चांगलेच राजकारण रंगले असून मनसेचे माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष नीलेश माझिरे यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. पुण्यातील मनसे नेते साईनाथ बाबर आणि बाबू वागसकर यांच्यामुळे पक्ष सोडल्याचा दावा माझिरे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबद्दल घेतलेल्या भूमिकेनंतर नगरसेवक तथा तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांचे पद काढून घेत साईनाथ बाबर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. वेळोवेळी मनसेकडून वसंत मोरे यांना डावलण्याचे प्रकार सुरू असतानाच त्यांचे कट्टर समर्थक तथा मनसे माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष नीलेश माझिरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी माझिरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. तर बाबू वागसकर यांनी पक्षात राहणार का अशी विचारणा केली होती. या दोघांमुळेच पक्ष सोडल्याचे माझिरे यांनी म्हटले असून पक्षात सध्या हुकुमशाही वातावरण सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
वसंत मोरे यांचा समर्थक असल्यामुळेच मला माथाडी कामगार सेनेच्या शहराध्यक्षपदावरून बाजूला केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोअर कमिटीलाच आपण नको असल्यामुळे कारस्थान केले गेल्याचेही त्यांनी सांगितले आहे.दरम्यान, माझिरे यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला पुण्यात चांगलाच धक्का बसला असून पक्षात एकच खळबळ उडाली आहे.