
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्त तपासणी अहवालात फेरफार करणाऱ्या ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे या तिघांच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या तिघांनाही पुणे न्यायालयाने ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुण्यात कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातात एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. हा अपघात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने केला होता. या अल्पवयीन आरोपीला अटक केल्यानंतर ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी डॉ. अजय तावरे याच्या सांगण्यावरून तपासणीसाठी दिलेले रक्त बदलण्यात आले होते. ही बाब पोलिस तपासात समोर आल्यानंतर दि. २७ मे रोजी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना अटक करण्यात आली होती.
सुरुवातीला न्यायालयाने या तिघांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्यानंतर आज पुन्हा या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर या तिघांना आणखी सात दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या तिघांचाही मुक्काम ५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत असणार आहे. या काळात पोलिसांकडून या प्रकरणातील आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आज न्यायालयात पोलिसांच्या वतीने विविध मुद्दे समोर आणले गेले. या घटनेत अल्पवयीन आरोपीशिवाय अन्य लोकांचेही रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यामध्ये अल्पवयीन आरोपीच्या आईचेही रक्त घेतले गेले. त्याशिवाय अनेकजण या प्रकरणात संशयित असून त्याचाही तपास करण्यासाठी पोलिस कोठडीत वाढवावी असे पोलिसांकडून सांगण्यात आले.