Site icon Aapli Baramati News

PUNE BREAKING : कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू; उपचारादरम्यान झाला मृत्यू, पुण्यात खळबळ

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार करण्यात आला आहे. कोथरूड परिसरात शुक्रवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी दुपारी कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला. कोथरूड परिसरातील सुतारदरा या भागात शरद मोहोळ याच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी शरद मोहोळ याच्या खांद्याला लागली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी झालेल्या शरद मोहोळ याला कोथरूड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच शरद मोहोळ याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकल्याचं बोललं जात आहे. शरद मोहोळ याच्यावरील हल्ला यातूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

लग्नाचा वाढदिवस अन शरद मोहोळचा खून

शरद मोहोळ याच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. आजच्या दिवशीच त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा गोळीबार केला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version