Site icon Aapli Baramati News

Political Breaking : वसंतभाऊ.. एकदाच काय तो निर्णय घे; रुपाली ठोंबरे यांचं वसंत मोरेंना आवाहन

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना डावलण्यात येत असल्याने पक्षातूनच हे सगळं घडवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावर माजी मनसैनिक आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी वसंतभाऊ, कितीवेळा लाईव्ह येवून मनसेत असल्याचं सांगणार असा सवाल करत आता काय तो एकदाचा निर्णय घे असे आवाहन केले आहे.

मशिदीवरील भोंग्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आव्हान दिल्यानंतर वसंत मोरे यांनी या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे  यांना हटवत नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. या दरम्यान, वसंत मोरे यांना राज ठाकरे यांनी मुंबईत बोलावून घेत त्यांची नाराजी दूर केली होती. त्यानंतर ठाणे येथील सभेत वसंत मोरे यांनी भाषणही केले.

या सर्व घडामोडीनंतर मनसेत सर्व काही आलबेल आहे हे दाखवले गेले. मात्र प्रत्यक्षात मनसेत बऱ्याच कुरबुरी सुरू असल्याचे समोर आले आहे. वसंत मोरे यांनी मतभेद कुठेतरी मनभेदाकडे जायला लागले असून ते जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतोय. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे.

मी मनसेत आहे हे मला सारखं सांगावं लागतंय हे माझं दुर्दैव आहे. यामागे कुणीतरी असून तेच हे सगळं घडवून आणतायत असंही वसंत मोरे यांनी सांगितले आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किती वेळा फेसबुक लाईव्ह करून मी मनसेत आहे हे सांगणार..? वसंत भाऊ आता एकदाच काय तो निर्णय घे असे आवाहनच त्यांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version