पुणे : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप घेणारे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे अद्यापही नाराज असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे हे दोन दिवस पुण्यात असताना वसंत मोरे मात्र गायब होते. त्यामुळे वसंत मोरे अजूनही नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढावेत अन्यथा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवताना माझ्या प्रभागात मशिदीसमोर भोंगे लावणार नाही असे जाहीर केले होते.
त्यानंतर अचानक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. या सर्व प्रकारानंतर वसंत मोरे यांची राज ठाकरेंशी भेटही झाली. विशेष म्हणजे ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत वसंत मोरे यांनी भाषणही केले होते. मात्र दोन दिवस राज ठाकरे पुण्यात असताना वसंत मोरे गायब असल्याच्या चर्चा झडत आहेत.
आज राज ठाकरे हे पुण्यातील निवासस्थानाहुन औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मनसेचे पुणे आणि मुंबईतील कार्यकर्ते, पदाधिकारी जातीने हजर आहेत. परंतु या सर्वांमध्ये एका व्यक्तीची मात्र कमी जाणवते. ते म्हणजे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे.
राज ठाकरे हे शुक्रवारी पुण्यात आले. त्यावेळी पुण्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. परंतु वसंत मोरे मात्र गैरहजर होते. त्यानंतर आज सकाळपासूनच राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर मोठ्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी जमले आहेत. मात्र वसंत मोरे गैरहजर आहेत.
एकूणच राज ठाकरे यांच्या पुण्यातील प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावणाऱ्या, पुढाकार घेणारे वसंत मोरे गैरहजर असल्याने त्यांची नाराजी अद्याप कायम आहे की त्यांनी मनसे सोडली असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.