इंदापूर : प्रतिनिधी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापुरमध्ये आतापासूनच राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीलाल बोराटे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर अर्बन बँक येथे झालेल्या कार्यक्रमात कांतीलाल बोराटे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांनी कांतीलाल बोराटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे उस्फुर्त स्वागत करत आगामी काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
इंदापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी केवळ खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. या खोट्या आश्वासनांना जनता बळी पडली होती. आता नव्याने आलेले सरकार हे जनतेचे सरकार असून कांतीलाल बोराटे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि जनतेचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी विद्यमान लोकप्रतिनिधींवर नाराज असून आगामी काळात ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी इंदापूर बँकेचे अध्यक्ष देवराम जाधव, निरा भिमा कारखान्याचे संचालक विलास वाघमोडे, पै. पिंटू काळे व पदाधिकारी उपस्थित होते.