शिरूर : प्रतिनिधी
काही वर्षांपूर्वी स्व. बाबुराव पाचर्णे आणि पोपटराव गावडे यांच्यात विधानसभेसाठी लढत झाली होती. त्यावेळी गावडे हे साहेबांचे उमेदवार, तर पाचर्णे हे अजितदादांचे उमेदवार असा प्रचार केला गेला. वास्तविक साहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते आणि आजही वेगळे नाहीत. तुम्ही कुणी काही काळजी करायची गरज नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरूरमध्ये बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
शिरूर तालुक्यातील तर्डोबाचीवाडी येथे माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या स्मारक लोकार्पण व प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, नीलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदीप कंद, दादा पाटील फराटे, प्रदीप वळसे पाटील, शेखर पाचुंदकर, राजेंद्र नागवडे, जाकिर पठाण, राहुल पाचर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीच्या काळात बाबूराव पाचर्णे हे बाजार समितीत काम करत होते. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची बाबुराव पाचर्णे यांची पद्धत होती. अजित पवार यांनी स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतानाच त्यांचं स्मारक हे सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारं ठरेल असं मत व्यक्त केलं.
याचवेळी अजित पवार यांनी १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा किस्सा सांगितला. १९९५ साली विधानसभा निवडणुकीत पोपटराव गावडे हे साहेबांचे उमेदवार, तर बाबुराव पाचर्णे हे अजितदादांचे उमेदवार असा प्रचार केला जात होता. परंतु त्या वेळेसही मी आणि साहेब वेगळे नव्हतो आणि आजही आम्ही वेगळे नाही. त्यामुळे कुणी काळजी करण्याचं कारण नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.