Site icon Aapli Baramati News

पोलिसांचा इशारा; वाहनाचालकांची उडाली तारांबळ, प्रत्यक्षात घडलं असं काही..!

ह्याचा प्रसार करा

मंचर : प्रतिनिधी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे वाहनासह उभ्या असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हाताचा इशारा करून वाहने थांबवली. त्यामुळे आपली काहीतरी चूक झालीअसे समजून वाहन चालकांची तारांबळ उडाली. पण पोलीस अधिकारी सतीश होडगर यांनी हातात फूल देऊन जागतिक चालक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यानंतर वाहनचालक भारावून गेले. मंचर पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

जागतिक चालक दिनानिमित्त मंचर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक आणि ५० वाहन चालकांचा सन्मान करण्यात आला. मंचर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सतीश होडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, उपपोलीस निरीक्षक रूपाली पवार यांच्या हस्ते पोलीस नाईक राजेश तांबे, शरद कुलवडे, संतोष कोकणे या पोलीस वाहनचालकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस उपनिरीक्षक मयुरी तुरे, सोमनाथ वापगावकर, राजेश नलावडे उपस्थित होते. राजेश तांबे यांनी मनोगत व्यक्त करून झालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होडकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी गेटवेल हॉस्पिटल, मंचर बसस्थानक परिसरात गेले.

रस्त्यावर उभे राहत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक वाहने थांबवली. अचानकपणे पोलिसांनी थांबवल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. मात्र जेव्हा पोलिसांनी गुलाबाची फुले देऊन वाहनचालकांचा सत्कार केला, तेव्हा त्यांना काहीसा सुखद धक्का बसला. पोलिसांकडून अनाहूतपणे झालेल्या स्वागताने चालकही भारावून गेले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version