
पुणे : प्रतिनिधी
वाढत्या अपघातांना आळा बसवण्यासाठी आता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नवीन आदेश काढले आहेत. पुण्यात उद्यापासून हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये चार वर्षांवरील मुलांचा देखील समावेश आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याने पुणेकरांना आता हेल्मेटचा भार सोसावा लागणार आहे.
जिल्हाधिकार डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश पारित केले आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालय, महानगरपालिका आणि शासकीय कर्मचाऱ्यांनादेखील हेल्मेट वापरणे बंधनकारक असणार आहे. एखादा अपघात झाला तर त्या व्यक्तीचा ८० टक्के जीव हा हेल्मेटमुळेच वाचतो. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार त्याचबरोबर न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर गाडी चालवणाराच्या पाठीमागे असणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.
वाहन अपघातांच्या मृतांमध्ये ८० टक्के व्यक्ती या पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वर असतात. चारचाकी धारकांच्या तुलनेत हा विचार करायचा झाल्यास दुचाकी वाहनचालकाचा अपघाती मृत्यू होण्याचा धोका हा सातपट जास्त आहे. जेवढे वाहन चालक अपघातात आपला जीव गमावतात यापैकी तब्बल ६२ टक्के व्यक्ती डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे पुण्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.