Site icon Aapli Baramati News

दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

कारागृहातील कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यामार्फत निर्मित वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने येरवडा खुले कारागृह येथील महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्रामार्फत दिवाळी सणानिमित्त प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर आदी उपस्थित होते.

सामान्य नागरीकांना अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या कारागृह बंदीनिर्मित विविध वस्तू उपलब्ध करुन देण्यात आलेल्या असून त्याचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी केले. याप्रसंगी कारागृहाचे उपअधीक्षक बी. एन. ढोले, पल्लवी कदम, रविंद्र गायकवाड, मंगेश जगताप, नागेश पाटील आदी उपस्थित होते.

कारागृह उद्योग विक्री केंद्राचा उपक्रम

कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक असतो, त्यामुळे निश्चितच त्यांच्यात विविध प्रकारचे उपजत कलागुण असतात. त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सुधारणा व पुनर्वसन हे ब्रीद असलेल्या कारागृह विभागाकडून बंद्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्यामार्फत बंदी निर्मित वस्तूंची विक्री करण्यात येते.

विविध सणांचे औचित्य साधून प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. प्रदर्शनात बंद्यांनी सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तू, आकाशकंदील, कपडे, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, लाडू, शेव, बिस्कीट आदी जीवनोपयोगी वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनास सामान्य नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून बंद्यांनी हातमागावर तयार केलेल्या विविध रंगाच्या पैठणी साड्यांचे प्रदर्शनात मुख्य आकर्षण आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version