बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉँग्रेस सोशल मीडिया सेलच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बारामती येथील अमोल कावळे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते आज मुंबईत कावळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षाची सुत्रेही हाती घेतली आहेत. आज मुंबईतील ‘देवगिरी’ या निवासस्थानी अजित पवार यांनी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह मंत्री आणि आमदारांच्या बैठका घेतल्या. या दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अमोल कावळे यांची निवड करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अमोल कावळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या सार्वजनिक तसेच लोकोपयोगी कामांचा लेखाजोखा सोशल मिडियातून मांडणार असून पक्षाची ध्येयधोरणे आणि भूमिका तळागाळात पोहोचवण्यासाठी या संधीचा उपयोग करणार असल्याचे अमोल कावळे यांनी निवडीनंतर सांगितले.