
पुणे : प्रतिनिधी
मनोहर उर्फ संभाजी भिडे याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करुन निषेध करण्यात आला. भिडे याला या अवमानकारक वक्तव्याबद्दल अटक करुन कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी हे शेवटच्या श्वासापर्यंत या देशासाठी लढले. या राष्ट्रपित्याचा अपमान आपण कोणीही सहन करू शकत नाही. मनोहर भिडे ही व्यक्ती संभाजी हे नाव लावून जनतेची फसवणूक करत आहे याचा तपास करून या व्यक्तीस त्वरीत अटक करावी अशी मागणी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी यावेळी केली.
संभाजी भिडे याला राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्याची खोड आहे. ही वक्तव्ये जाणिवपूर्वक केली जात असून याम माध्यमातून दोन समाजामध्ये दंगली घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य शासनाने याची अतिशय गंभीर अशी दखल घेऊन संभाजी भिडे याच्यावर कारवाई करणे गरजेचे असल्याचे प्रदीप देशमुख यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महात्मा गांधी अमर रहे, महात्मा ज्योतीबा फुलेंचा विजय असो यासह भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनावेळी शहराध्यक्ष दिपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, बाबा पाटील, पुनम पाटील, रूपाली ठोंबरे, पुजा झोळे, बाळासाहेब बोडके, बाबा धुमाळ, प्रिया गदादे, विनोद ओरसे, संतोष नांगरे, अब्दुल सत्तार, विनोद पवार, शिवाजी पाडाळे, संतोष बेन्द्रे, सोनाली गाढे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.