
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या एका मुलींच्या शाळेत जाऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळख असल्याचा बहाणा करून तिला बाथरूममध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला आहे. याबाबत मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी जंगली महाराज रस्त्यावरील शाळेत शिकत असुन ती बुधवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सकाळी अकराच्या सुमारास अनोळखी व्यक्ती शाळेत आला. त्याने या मुलीसोबत ओळख आहे, असा बहाणा करून तिला शाळेच्या बाथरूममध्ये ओढत नेले. तिथे त्याने तिचे तोंड दाबून अत्याचार करून याबाबत कुणाला न सांगण्याची धमकी दिली. या घटनेनंतर तो नराधम पसार झाला आहे.
त्यानंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला तिच्यासोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली.त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांनाही या घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ मुलीच्या आईला आणि पोलिसांना शाळेत बोलवले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेत येऊन या घटनेची माहिती घेतली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.