पुणे : प्रतिनिधी
सिनेमात काम मिळवून देतो असे आमिष दाखवून एका बॅकस्टेज अभिनेत्रीवर दिग्दर्शकानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याबाबत पिडीत अभिनेत्रीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अमित प्रेमचंद (वय ४० वर्षे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार मे २०१७ पासून ते २६ मार्च २०२२ पर्यंत घडला आहे. या अभिनेत्रीची ओळख एका मित्राच्या माध्यमातून या दिग्दर्शकासोबत झाली होती. सन फिल्मस कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या अमित याने तिला मे २०१७ मध्ये पार्टीसाठी बोलवले होते. परंतू तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.
या पीडित अभिनेत्रीला त्याने वेगवेगळ्या पार्टीला बोलावून अत्याचार केला. बदनामीच्या भीतीने या अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. परंतु सतत होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून तिने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित दिग्दर्शकाविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.