Site icon Aapli Baramati News

दौंड विकास आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; ‘त्या’ तलावाला कुंपण घालण्याची मागणी

ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी  

दोन दिवसांपूर्वी दौंड नगरपरिषदेच्या साठवण तलावात बुडून तीन महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर दौंड शहर विकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत साठवण तलावाच्या सुरक्षिततेबाबत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

दि. ६ मार्च रोजी दुपारी दौंड शहरातील काही महाविद्यालयीन युवक साठवण तलाव परिसरात फोटो शूटसाठी गेले होते. याच दरम्यान एक युवक पाण्यात बुडू लागला, त्याला वाचवण्यासाठी इतर दोघेही पुढे सरसावले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. आतापर्यंत या तलावात बुडून २५ ते ३० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

साठवण तलावास लागून वन विभागाचे क्षेत्र आहे. हल्ली फोटोशूटसाठी मोठ्या प्रमाणात लोक या परिसरात येत असतात.  पोहण्यासाठी मनाई असल्याबाबत कोणताही फलक नगरपरिषदेने या ठिकाणी लावलेला नाही.  तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक निष्पाप व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे.

या पार्श्वभूमीवर दौंड शहर विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले आहे. या तलावाभोवती कुंपण बांधण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नगरपरिषदेला तलाव परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना राबावण्याबाबत सूचना देण्यात याव्यात असेही या निवेदनात म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version